नांदेड जिल्ह्यास चार दिवसांचा येलो अलर्ट; २५ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा

नांदेड | प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दि. २४ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता जारी केलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. २४ ते २७ जून २०२६ या कालावधीत येलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि. २४, २६ व २७ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दि. २५ जून रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजांच्या कडकडाटावेळी घ्यावयाची खबरदारी

  • वादळी पाऊस व विजांचा अंदाज असल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
  • सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेर थांबू नये.
  • घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करावीत.
  • विजेचे खांब, लोखंडी वस्तू व तारांच्या कुंपणांपासून दूर राहावे.
  • पाण्यात उभे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावे.

या गोष्टी टाळा

  • विजांचा कडकडाट सुरू असताना लँडलाईन फोन, विद्युत उपकरणे किंवा पाण्याच्या पाईपलाईनचा वापर करू नये.
  • उंच झाडाखाली, लोखंडी शेड किंवा तंबूमध्ये आश्रय घेऊ नये.
  • उंच मनोरे किंवा धातूच्या संरचनांजवळ उभे राहू नये.
  • विजांचा कडकडाट सुरू असताना खिडकी किंवा उघड्या दारातून बाहेर पाहणे टाळावे.

संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!