
शेतकऱ्यांना शास्त्रोक्त नियोजनाचे आवाहन; बीज उगवण चाचणी व बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला
नांदेड | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, अर्धापूर यांनी केले आहे. परिसरात किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन बियाण्यांची उगवण चांगली होईल आणि पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस पोषक वातावरण मिळेल, असे त्यांनी सांगितले.


हवामानातील सातत्याने होत असलेले बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान आधारित सल्ल्याचे पालन करावे. योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवरील जोखीम कमी होण्यास मदत होते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.


कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यास अपेक्षित रोपसंख्या मिळण्यास मदत होते. कमी उगवणक्षम बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.


तसेच बियाण्यांना बुरशीजन्य व कीडजन्य रोगांपासून संरक्षण मिळावे यासाठी शिफारशीनुसार बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी प्रमाणित आणि दर्जेदार बियाण्यांची निवड करावी तसेच संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


योग्य नियोजन, शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा वापर आणि हवामानानुसार निर्णय घेतल्यास खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळू शकते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित आणि यशस्वी खरीप हंगामासाठी तयारी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांनी केले आहे.
