पहिल्याच दमदार पावसाने हिमायतनगरची दाणादाण; रस्त्यावर वाहिली गटारगंगा

हिमायतनगर, अनिल मादसवार| मृग नक्षत्र लागल्यानंतर हिमायतनगर शहर व परिसरात बुधवार (दि. 24) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. या हंगामातील पहिल्याच पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना व पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, या पावसाने हिमायतनगर नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

पहिल्याच पावसात शहरातील अनेक नाल्या तुंबल्याने रस्ते आणि गटारे एकरूप झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हिमायतनगर शहरात आठवडी बाजारासाठी आलेल्या महिला व पुरुष नागरिकांना दुर्गंधीयुक्त घाण पाण्यातून मार्ग काढत बाजार करावा लागला. मुख्य रस्त्यांवर गटारगंगा वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

शहरातील आठवडी बाजार परिसर, सराफ लाईन, जनता कॉलनी, आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, बस स्थानक परिसर, चौपाटी मार्केट, ग्रामीण रुग्णालय परिसर, बोरगडी रस्ता, मारोती मंदिर, बजरंग चौक, सिरंजनी रस्ता, मुर्तूजा नगर, गणेशवाडी यांसह विविध भागांमध्ये पावसाचे व सांडपाण्याचे मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी दिसून आले. अनेक ठिकाणी दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर तर काही सखल भागांतील घरांमध्ये शिरल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Oplus_16908320

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची प्रभावी साफसफाई करण्यात नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नाल्यांमधील गाळ आणि कचरा वेळेत न काढल्यामुळे पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या दुर्लक्षित कारभाराचे पितळ उघडे पडल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे. मात्र, खरी पेरणी सुरू होण्यासाठी आणखी पेरणीयोग्य पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मान्सूनच्या आगमनामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत असला, तरी हिमायतनगर शहरातील नागरी सुविधांबाबत नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!