
हदगाव, गौतम वाठोरे| माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना हदगाव तालुक्यातील मनुला बुद्रुक येथे उघडकीस आली आहे. आई-वडिलांनीच आपल्या दोन चिमुकल्या मुलांना विषारी औषध पाजल्याच्या आरोपामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, या दुर्दैवी घटनेत एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी चिमुकली जीवनासाठी झुंज देत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धांत भालेराव आणि त्यांची पत्नी शुभांगी भालेराव हे आपल्या दोन मुलांसह राहत होते. १४ जूनच्या रात्री त्यांनी मुलांना खोकल्याच्या औषधाच्या बहाण्याने विषारी द्रव्य पाजल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा प्रकार बाहेर येऊ नये म्हणून घराला कुलूप लावून स्वतः आतच राहिल्याची माहिती समोर आली आहे.


दुसऱ्या दिवशी सायंकाळी आजोबा नंदू भालेराव घरी आल्यानंतर घरातील परिस्थिती पाहून हादरले. दोन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती आणि त्यांना उलट्यांचा त्रास होत होता. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी विषबाधा झाल्याचे स्पष्ट केले.


उपचार सुरू असतानाच १७ जून रोजी ५ वर्षीय सुमित याचा मृत्यू झाला. तर ७ वर्षीय साक्षी अद्याप उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.


“मम्मी-पप्पांनी औषध पाजलं…”
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साक्षीने आजोबांना दिलेली माहिती. आजोबांनी विचारपूस केली असता, “मम्मी आणि पप्पांनी आम्हाला खोकल्याचे औषध पाजले आणि चिवडा खायला दिला,” असे तिने सांगितल्याचे समोर आले आहे. या निष्पाप शब्दांनी संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी आजोबा नंदू भालेराव यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात सिद्धांत भालेराव आणि शुभांगी भालेराव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून नांदेडच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले आहेत.
आई-वडिलांनीच आपल्या लेकरांच्या जीवावर उठल्याच्या आरोपामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, या घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
