
हिमायतनगर | हिमायतनगरच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, आदर्श शिक्षक तसेच उत्कृष्ट चित्रकार म्हणून परिचित असलेले गुरुवर्य कै. बाबुराव गोपाळराव घुंगरे (वय 75) यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, कला आणि समाजजीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना घुंगरे सरांनी केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण दिले नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कारांची समृद्ध शिदोरीही दिली. चित्रकला विषयातील त्यांचे प्रभुत्व, विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपुलकीने पाहण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके गुरुजी बनले होते.


घुंगरे सरांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करत आहेत. विशेषतः चित्रकला आणि सर्जनशील क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कलाकारांसाठी ते प्रेरणास्थान होते. त्यांच्या कलाकृतींनी आणि अध्यापनशैलीने अनेकांच्या जीवनाला दिशा दिली.


साधेपणा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या गुणांमुळे त्यांनी शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक आदर्श नागरिक म्हणूनही वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सोशल मीडियावरून शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गोपाळ घुंगरे, श्रीकांत घुंगरे आणि रवी घुंगरे यांचे ते वडील होत.


त्यांच्या पार्थिवावर दि. 20 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता हिमायतनगर येथील हिंदू स्मशानभूमी, लकडोबा चौक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुवर्य बाबुराव घुंगरे यांच्या रूपाने शिक्षण, कला आणि संस्कारांचा एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला असून त्यांच्या कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहील. अशा शब्दात अनेकांनी घुंगरे गुरुजींना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
