नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक : 99.78 टक्के विक्रमी मतदान

नांदेड| महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (18 जून) शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर एकूण 452 पैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 99.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील किनवट, हदगाव, नांदेड, कंधार, धर्माबाद, बिलोली आणि देगलूर या सात मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले, तर भोकर केंद्रावर 97.92 टक्के मतदान नोंदविण्यात आले.

नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असून, मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच वेब कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले.

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी नांदेड, बिलोली, हदगाव, भोकर आणि धर्माबाद येथील मतदान केंद्रांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही नांदेड मतदान केंद्राची पाहणी केली.

मतदानाच्या टप्प्याटप्प्याने वाढलेल्या टक्केवारीनुसार सकाळी 10 वाजेपर्यंत 4.87 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 56.86 टक्के आणि दुपारी 2 वाजेपर्यंत 88.94 टक्के मतदान झाले होते. अंतिमतः 452 पैकी 451 मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांमध्ये 228 पुरुष व 224 महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी सर्व 228 पुरुष मतदारांनी तर 223 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आणून कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँगरूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवण्यात येणार असून, सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, 22 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या तळमजल्यावरील कॅबिनेट हॉलमध्ये होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!