हिमायतनगर तहसील प्रशासन जागे झाले! वडगावकरांच्या अर्धनग्न आंदोलनानंतर अधिकाऱ्यांची धावपळ

प्रलंबित प्रश्नांवरून संतापाचा उद्रेक; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, रखडलेले पांदण रस्ते, महसूल विभागातील दिरंगाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत महसूल प्रशासनाला धारेवर धरले.

तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसून केलेल्या या आंदोलनामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वडगावकर यांनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा निषेध नोंदविला. “निवेदने दिली, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, पाठपुरावा केला; मात्र प्रश्न जैसे थेच आहेत. त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला,” अशी तीव्र प्रतिक्रिया वडगावकर यांनी यावेळी व्यक्त केली.

विशेषतः ग्रामीण भागातील पांदण रस्ते, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, शासकीय योजनांची अपुरी अंमलबजावणी आणि शेतकरी-मजुरांच्या प्रश्नांवर प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पांदण रस्ते खुले करून त्यांचे मजबुतीकरण करण्याबाबत आदेश निघूनही प्रत्यक्ष कामे सुरू नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार पंगे, मंडळ अधिकारी चव्हाण यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून मागण्यांची लवकर पूर्तता न झाल्यास आणखी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे हिमायतनगर तालुक्यात महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आता प्रशासन प्रत्यक्षात काय पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!