ऑपरेशन क्रॅकडाऊनचा करारा दणका; हिमायतनगरात 11 लाखांचा गुटखा जप्त!

हजरत चौकात पोलिसांचा सापळा यशस्वी; दोन गुटखा तस्कर जेरबंद

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड पोलिसांच्या ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहिमेचा जोरदार धडाका हिमायतनगरात पाहायला मिळाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या थरारक कारवाईत 11 लाख 15 हजार 640 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित जर्दा आणि तंबाखूचा साठा जप्त करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या पथकाने हजरत चौक, बेस्ट कॉलनी परिसरात सापळा रचला. संशयित स्विफ्ट डिझायर (MH 48 F 0708) कारची झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पानमसाला आढळून आला.

यावेळी शेरखॉन मुसाखान पठाण (वय 32) व शाहरूखखान मुसाखान पठाण (वय 28) संभाजीनगर तामसा तालुका हदगांव या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत आरोपींनी सदरचा गुटखा, पानमसाला हा साई भैया रा. मुधोळ तेलंगणा याचेकडून खरेदी करून आनल्याचे तसेच याव्यतीरीक्त आणखी गुटखा, पानमसाला हा हिमायतनगर येथील किरायाने राहत असलेल्या घरामध्ये लपवुन ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घरावर धाड टाकत मोठा साठा हस्तगत केला.

या कारवाईत 4.15 लाखांचा प्रतिबंधित गुटखा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 11.15 लाख रुपये इतकी आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी मोहीम फत्ते केली.

अन्न व औषध प्रशासनाच्या अमृता दुधाटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अवैध गुटखा तस्करीविरोधातील या मोठ्या कारवाईमुळे हिमायतनगर परिसरातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडक मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!