
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| पारंपारिक लोककलावंतांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेल्या पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने सौ. मुक्ताताई पांडुरंग बनसोडे यांची हिमायतनगर तालुका महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे (कामारीकर) यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष शाहीर रमेश नार्लेवाड हाळदेकर यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.


नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ हे सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात कार्यरत असून लोककलावंतांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील सौ. मुक्ताताई बनसोडे यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.


या पदाच्या माध्यमातून तालुक्यातील लोककलावंतांचे संघटन मजबूत करणे, त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे तसेच कलावंतांच्या हक्कांसाठी व्यापक कार्य करणे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या नियुक्तीप्रसंगी जिल्हाध्यक्ष शाहीर बापूराव जमदाडे, महिला प्रमुख सौ. उज्वला भवरे, जिल्हा सचिव शाहीर सुभाष गुंडेकर तसेच जिल्हा उपाध्यक्ष शाहीर रमेश सरपे, यशवंत यनगुलवार, पांडुरंग बनसोडे यांनी मुक्ताताई बनसोडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


मुक्ताताई बनसोडे यांच्या नियुक्तीमुळे हिमायतनगर तालुक्यातील लोककलावंतांच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
