तृतीयपंथी संशोधक डॉ. सान्वी जेठवाणी यांची भारत सरकारच्या प्रतिष्ठित ज्युनियर फेलोशिपसाठी निवड

नांदेड | नांदेडच्या सुप्रसिद्ध तृतीयपंथी समाजसेविका, लावणी कलाकार, सांस्कृतिक कार्यकर्त्या व संशोधक डॉ. सान्वी जगदीश जेठवाणी यांची भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सांस्कृतिक साधन व्यक्ती आणि प्रशिक्षण केंद्र (CCRT) मार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या “Award of Junior Fellowship (Batch 2025–2026)” या प्रतिष्ठित राष्ट्रीय फेलोशिपसाठी निवड झाली आहे. देशभरातून आलेल्या अर्जांची कठोर छाननी, तज्ज्ञ समितीचे मूल्यमापन आणि निवड प्रक्रियेनंतर त्यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. जेठवाणी यांचा संशोधन विषय “Performing Identities: A Socio-Cultural Study of Transgender Participation in Lavani Folk Tradition of Maharashtra” असा असून, या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील लावणी लोकपरंपरेमध्ये तृतीयपंथी कलाकारांचे योगदान, त्यांचा सांस्कृतिक वारसा, सामाजिक स्थान, संघर्ष, कलात्मक अभिव्यक्ती आणि बदलती ओळख यांचा शास्त्रीय अभ्यास केला जाणार आहे. तृतीयपंथी कलाकारांच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण करून त्याला राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक मान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

डॉ. सान्वी जेठवाणी या सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेडच्या अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा, तसेच भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश तृतीयपंथी सेलच्या राज्य समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक न्याय, तृतीयपंथी हक्क, लोककला संवर्धन आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!