
नांदेड | मॉरिशस येथे होणाऱ्या सातव्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनातील गझल मुशायरा व कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेडचे ज्येष्ठ कवी व गझलकार बापू दासरी यांची निवड करण्यात आली आहे. आयोजकांनी नुकतीच ही घोषणा केली असून, त्यांच्या निवडीमुळे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


गेल्या चार दशकांपासून मराठी गझल चळवळीत सक्रिय असलेल्या बापू दासरी यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक काव्यमैफिली, शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम आणि गझल मुशायऱ्यांचे प्रभावी सूत्रसंचालन केले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेऊन त्यांची या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय साहित्यिक व्यासपीठावर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


नांदेड येथे गेल्या अकरा वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा असून ते या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेल्या एका लावणीला प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी संगीत दिले असून ती सुरेखा पुणेकर यांनी सादर केली आहे. या लावणीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.


डिसेंबर २०२५ मध्ये हेमलकसा येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. या संमेलनात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.


राजपत्रित अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतानाच साहित्य क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन राज्यस्तरीय काव्यस्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिके त्यांनी मिळविली आहेत. मागील निवडणुकांमध्ये मतदार जागृतीसाठी त्यांनी लिहिलेले मतदानावरील गीत राज्यस्तरावर गौरविण्यात आले होते.
अलीकडेच राजहंस प्रकाशन यांनी त्यांचा ‘मातृ सूक्त’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. तसेच ते साहित्य भारती या साहित्यिक चळवळीचे जिल्हाध्यक्ष असून कलांगण प्रतिष्ठान व ललित कला प्रतिष्ठान या सांस्कृतिक संस्थांमध्येही पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक कल्याणाच्या विविध उपक्रमांमध्येही ते सक्रिय असून जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. नवोदित गझलकारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी अनेक गझल कार्यशाळांचे आयोजन केले आहे. बापू दासरी यांच्या या निवडीमुळे साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
