आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

प्रलंबित 5 टक्के निधीसह विविध मागण्यांसाठी महापालिकेत धडक आंदोलन
नांदेड | महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रलंबित 5 टक्के राखीव निधीसह विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शेकडो दिव्यांग बांधवांनी थेट महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला. अचानक उभारलेल्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनात काही काळ खळबळ उडाली.

सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात दिव्यांगांच्या खात्यात प्रलंबित निधी जमा करणे, दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उपलब्ध करून देणे, कर्मचारी संख्या वाढविणे, स्वयंरोजगारासाठी गाळे व जागा उपलब्ध करून देणे, घरकुल, पार्किंग ठेके तसेच शासकीय अनुशेष भरणे अशा विविध मागण्यांवर प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. 151 दिव्यांग लाभार्थ्यांपैकी कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 137 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित निधी आज सायंकाळपर्यंत अथवा उद्यापर्यंत जमा करण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्तांनी दिले.

याशिवाय दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, अतिरिक्त दोन कर्मचारी नेमणे तसेच दिव्यांगांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्या विरोधात योग्य कारवाई करण्याबाबतही प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रशासनाकडून लेखी व तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनात सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली अमरदिप गोधने, प्रमोद मांजरमकर, शिवाजी सूर्यवंशी, सय्यद आरिफ, कार्तिक कुमार भरतिपुरम, प्रदीप हनवते, शेख मतीन, शेख माजिद, अजय गोरे, रमेश लंकाढाई, राजू ईराबत्तीन, मोहसिन खान, मंगेश जाधव, शेख आलिम, आत्माराम लोंढे, रामेश्वर बंडेवार, नागोराव कदम, मोसिन कादरी, प्रशांत हणमंते, भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, जैनाज खानम, लोणे ताई यांच्यासह शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलनस्थळी तृतीयपंथीय गुरूंनीही भेट देत प्रशासनाने दिव्यांगांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!