शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना सदिच्छा भेटी

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची विष्णुपुरी जि.प. हायस्कूलला भेट; विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
नांदेड | महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळा परिसरात आनंद, उत्साह आणि स्वागताचा माहोल पाहायला मिळाला.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने जिल्हाभरातील विविध शाळांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, शुभेच्छा आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जिल्हा परिषद हायस्कूल, विष्णुपुरी येथे भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमादरम्यान आरोग्यदूत म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बॅच व आरोग्यदूत पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड, विभागीय समन्वयक, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच विष्णुपुरी शाळेच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.

दरम्यान, विभागीय शिक्षण उपसंचालक दिपक चवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी (म.), ता. अर्धापूर येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले, शिक्षण विस्तार अधिकारी निजाम शेख, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण झाली असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला उत्साहपूर्ण सुरुवात मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!