हिमायतनगरला किनवट नव्हे, नांदेडच सोयीस्कर! — जेष्ठ पत्रकार असद मौलाना यांचे हरकतींसाठी जनतेला आवाहन

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील दुर्गम भागाच्या प्रशासकीय सोयीसाठी किनवट येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि इस्लापूर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असला, तरी हिमायतनगर तालुक्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव कितपत लाभदायक ठरणार, यावरून चर्चा रंगू लागली आहे.

विशेषतः हिमायतनगर तालुका व शहरातील नागरिकांसाठी नांदेड हे प्रशासकीयदृष्ट्या अधिक सोयीस्कर असल्याचे मत व्यक्त होत असून, या प्रस्तावावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्याचे आवाहन जेष्ठ पत्रकार असद मौलाना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

प्रशासनाने किनवट येथे नव्याने प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हिमायतनगर, हदगाव, माहूर, भोकर यांसह इतर तालुक्यांचा समावेश करण्याचा प्राथमिक प्रस्ताव जाहीर केला आहे. यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, हिमायतनगरच्या नागरिकांच्या दृष्टीने नांदेड हे अंतर, वाहतूक व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाजासाठी अधिक सुलभ असल्याचे मत पुढे येत आहे.

यासंदर्भात जेष्ठ पत्रकार असद मौलाना यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “हिमायतनगर तालुक्याच्या जनतेसाठी किनवटपेक्षा नांदेड अधिक सोयीचे आहे. हिमायतनगर तालुका स्थापन होत असताना किनवटमधील काही घटकांकडून तीव्र विरोध झाला होता. तसेच हिमायतनगर न्यायालयाच्या प्रश्नावरही विरोधाची भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे आता हिमायतनगरच्या जनतेने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करणे आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले की, “या महत्त्वाच्या विषयावर स्थानिक नेतेमंडळी मूग गिळून गप्प बसणार की जनतेच्या बाजूने उभे राहणार, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.”

दरम्यान, प्रशासनाने संबंधित नागरिकांना प्रस्तावाबाबत आक्षेप, सूचना किंवा हरकती असल्यास आवश्यक कागदपत्रांसह १५ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथे लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन केले आहे.

मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता हिमायतनगर तालुक्यातील नागरिक या प्रस्तावाला कितपत प्रतिसाद देतात आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!