भाजपच्या SIR बूथ मॅपिंग व संघटनात्मक आढावा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

सिरंजनी येथे संयुक्त बैठकीत बूथ सक्षमीकरणावर भर; शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
हिमायतनगर | सिरंजनी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद सरसम–सिरंजनी गट व दुधड–कामारी गटाची संयुक्त SIR बूथ मॅपिंग व संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख आणि जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथ सक्षमीकरण, संघटनात्मक बांधणी तसेच BLA-2 कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

बैठकीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख बारडकर, जिल्हा कोषाध्यक्ष दिगंबर टिपरसे, स्वीकृत नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे तसेच नगरसेवक आशिष सकवान यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, शिवसेना (उबाठा) गटाचे कार्यकर्ते विकास जाधव व कानिफनाथ देशमाने यांनी ॲड. किशोर देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

त्यांच्या प्रवेशामुळे परिसरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन करेवाड सिरंजनीकर यांनी केले, तर सूत्रसंचालन परमेश्वर सुर्यवंशी करंजीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिरंजनी येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!