जलधरा मंडळात चक्रीवादळासदृश्य वादळाचा तडाखा; घरावरील पत्रे उडाली, वीजपुरवठा ठप्प

किनवट–नांदेड मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा; नागरिकांची मोठी गैरसोय

किनवट/नांदेड| किनवट तालुक्यातील जलधरा मंडळात रविवारी (दि. १३) दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान चक्रीवादळासदृश्य प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या वादळामुळे अनेक गावांतील घरांवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले, तर किनवट–नांदेड राज्य मार्गावर झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

जलधरा मंडळातील बेल्लोरी धानोरा, धानोरा तांडा, पिंपरी, भंडारवाडी, गोंदखेडा, कोपरा, सावरी, डोंगरगाव तांडा, डोंगरगाव, दिग्रस, दिग्रस तांडा, थारा आदी गावांमध्ये वादळाचा जोरदार फटका बसला. अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

विशेषतः बेल्लोरी धानोरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.

दरम्यान, किनवट–नांदेड राज्य मार्गावरील सावरी घाट परिसरात अनेक झाडे मोडून रस्त्यावर कोसळल्याने काही तास वाहतूक ठप्प झाली होती. काही ठिकाणी अजूनही झाडे हटविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने वाहनधारकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवरही झाडे कोसळल्याने संपर्क व्यवस्था प्रभावित झाली.

या वादळी पावसाचा मोठा फटका महावितरणलाही बसला आहे. अनेक गावांमध्ये विजेचे खांब व तारा तुटून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विजेच्या तारांवर झाडे पडल्यामुळे गेल्या २४ तासांपासून अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वीज नसल्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली असून मोटारपंप बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उकाड्याच्या वातावरणात पंखे व कुलर बंद असल्याने ग्रामस्थांना अक्षरशः रात्र जागून काढावी लागली. काही गावांमध्ये अद्यापही वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

वादळग्रस्त गावांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, रस्त्यांवरील झाडे हटवून वाहतूक सुरळीत करावी आणि खंडित वीजपुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!