हिमायतनगर तालुक्यात तुफान वादळी वाऱ्याचा कहर; डीपी कोसळली, आखाड्यांवरील टिनपत्रे उडाली

शेतकरी व महावितरणचे मोठे नुकसान; निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने मोठे नुकसान घडवून आणले. बोरगडी–धानोरा परिसरात महावितरणची वीज डीपी पूर्णतः कोसळून पडली, तर अनेक शेतकऱ्यांच्या आखाड्यांवरील टिनपत्रे उडून गेली. याशिवाय शेकडो झाडे उन्मळून पडल्याने पर्यावरणालाही मोठा फटका बसला आहे.

मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस उलटून गेले असतानाही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात केवळ ढग दाटून येत असले, तरी पावसाने मात्र हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज असताना वरुणराजा मात्र दडी मारून बसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यातच रविवारी आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

बोरगडी–धानोरा परिसरातील महावितरणची डीपी वाऱ्याच्या तडाख्यात पूर्णपणे जमीनदोस्त झाली. तसेच शिवारातील अनेक आखाड्यांवरील टिनपत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने शेतीचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शेतकरी व महावितरणला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच कोसळलेल्या डीपीमुळे विस्कळीत झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख संजय काईतवाड यांनी केली आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यात डीपी पूर्णतः कोलमडून पडल्याने महावितरणच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “महावितरणकडून करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळेच हलक्या वादळात डीपी कोसळली,” असा आरोप नागरिकांतून होत आहे. तालुक्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या कामांची गुणवत्ता तपासून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विकासप्रेमी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!