श्री गणेश महापुराण कथेत पोलीस निरीक्षक केंद्रे सहपरिवार सहभागी

गणेश लीला, झांकी व भक्तिमय वातावरणाने हिमायतनगरकर भारावले काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने समारोप 

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर येथील श्री क्षेत्र परमेश्वर मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय श्री गणेश महापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरही या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहत आहेत. याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सहपरिवार उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेत कथाश्रवणाचा लाभ घेतला.

यावेळी श्री परमेश्वर मंदिर संस्थान कमेटीच्या वतीने पोलीस निरीक्षक केंद्रे यांचा श्रींची प्रतिमा भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

ह.भ.प. सुनील महाराज आष्टीकर यांच्या ओजस्वी वाणीतून सुरू असलेल्या श्री गणेश महापुराण कथेदरम्यान गणपती बाप्पांच्या विविध लीला आणि प्रसंग आकर्षक झांक्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले. या देखण्या व भावस्पर्शी झांक्यांमुळे उपस्थित भाविकांना श्री गणेश प्रत्यक्ष अवतरल्याचा अलौकिक अनुभव आल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

दररोज मोठ्या संख्येने महिला-पुरुष भाविक कथा श्रवणासाठी उपस्थित राहत असून, धार्मिक वातावरणाने संपूर्ण हिमायतनगर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. कथा दरम्यान मानवजन्माचे महत्त्व, धर्मपालन, आई-वडिलांची सेवा, गोसेवा, बंधुभाव आणि सदाचार यांचे महत्त्व ह.भ.प. महाराजांनी प्रभावीपणे विशद केले. या संगीतमय कथेला तबलावादक अक्षय माने (कौठाळी, सोलापूर), गायक माऊली महाराज (नांदेड) तसेच पॅड वादक ज्ञानेश्वर महाराज जालनेकर यांनी संगीत साथ दिली.

श्री परमेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यात ह.भ.प. सुनील महाराज आष्टीकर यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून विघ्नहर्ता श्री गणेशाची महती विशद केली. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असून, प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात प्रथम गणेश पूजनानेच होते, असे त्यांनी सांगितले.

दिनांक १२ रोजी काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला. यावेळी श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, संचालक मंडळाचे सदस्य तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक कथेने हिमायतनगरकर धन्य झाल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!