
परभणी/नांदेड | प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF) नांदेड विभागाने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर विशेष कारवाई करत प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे प्रवाशांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.


गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या विशेष देखरेखी दरम्यान आरपीएफचे एएसआय अमोल वावळे यांनी ९ आणि १० जून २०२६ रोजी परभणी रेल्वे स्थानकावर ‘थीफ्ट ऑफ पॅसेंजर बिलाँगिंग्स’ (ToPB) प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतले.


पहिली कारवाई ९ जून रोजी दुपारी १:५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर करण्यात आली. ट्रेन क्रमांक ५७६५२ मनमाड–हजूर साहिब नांदेड एक्सप्रेसच्या थांब्यादरम्यान किरण (वय २५, रा. बीड) हा संशयित जनरल डब्यात चढणाऱ्या प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे निदर्शनास आले. त्याला पुढील कारवाईसाठी जीआरपी परभणीकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११० व ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसरी कारवाई १० जून रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ट्रेन क्रमांक १७६६१ नागरसोल–काचीगुडा एक्सप्रेसच्या थांब्यादरम्यान करण्यात आली. दुपारी सुमारे २:२५ वाजता अनिस (वय ४२, रा. परभणी) यास प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या प्रयत्नात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध बीएनएसएस-२०२३ च्या कलम १२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.


त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत, दुपारी सुमारे २:३० वाजता चंद्रकांत (वय ४०, रा. नांदेड) यालाही त्याच रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्धही महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११० व ११७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सीआयबी-डी अँड आय पथकाच्या सतर्कता व तात्काळ कारवाईमुळे संभाव्य चोरीच्या घटना रोखण्यात यश आले असून गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेची प्रभावीपणे खात्री करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आरपीएफ नांदेडने प्रवाशांना प्रवासादरम्यान आपल्या सामानाची विशेष काळजी घेण्याचे, सतर्क राहण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांना किंवा रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
