
चेन्नई/नांदेड| दक्षिण रेल्वेच्या अरक्कोनम (AJJ) परिसरात तिसरी व चौथी मार्गिका जोडणी प्रकल्पांतर्गत नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम हाती घेण्यात येत असल्याने काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर 13 जून ते 28 जून 2026 या कालावधीत धावणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 16003 चेन्नई सेंट्रल–नगरसूल एक्स्प्रेस दिनांक 21 जून 2026 रोजी जोलारपेट्टई–कृष्णराजपूरम–धर्मावरम–गुंतकल या पर्यायी मार्गाने धावणार आहे. तसेच 28 जून 2026 रोजी हीच गाडी अरक्कोनम–काटपडी–जोलारपेट्टई–कृष्णराजपूरम–धर्मावरम मार्गे वळविण्यात येणार आहे.



या मार्ग बदलामुळे तिरुत्तणी, पुत्तूर, रेणीगुंटा, राजमपेट, कडप्पा, येर्रगुंटला, ताडीपत्री आणि गुटी या स्थानकांवरील नियोजित थांबे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता आहे.


याशिवाय, गाडी क्रमांक 16004 नगरसूल–चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस दिनांक 22 जून 2026 रोजी तब्बल 90 मिनिटे उशिराने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी सेवेद्वारे गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल व अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
