हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे संताप; रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल बंदची मागणी

हिमायतनगर| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, रस्ता दुरुस्त न करता टोल वसुली सुरू ठेवली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर युवती सेना जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत टोल नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, हिमायतनगर ते सरसम दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवडही करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांत या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडले असून, सुमारे 10 ते 15 जणांना जीव गमवावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक नागरिक कायमस्वरूपी जखमी किंवा अपंग झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रस्ता खड्डेमय असताना आणि अपघातग्रस्तांना प्राथमिक सुविधांचा अभाव असताना वाहनधारकांकडून टोल वसुली सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

“प्रथम रस्ता दुरुस्त करा, दुतर्फा झाडे लावा आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करा; त्यानंतरच टोल वसुली सुरू करावी,” अशी ठाम भूमिका प्राजक्ता गुंडेकर यांनी निवेदनातून मांडली आहे. या मागणीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन काय..? भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!