
हिमायतनगर, प्रतिनिधी | तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या एकंबा शिवारात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना दिनांक 8 जून रोजी उघडकीस आली आहे. शेतातील आखाड्यावर बांधलेल्या दोन वासरांवर वन्य प्राण्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत एका वासराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरे वासरू गंभीर जखमी होऊन नंतर मृत झाल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास शेतकरी शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. एकंबा शिवारातील शेतकरी सुनील सुभाष पिट्लेवाड व आकाश विठ्ठल पिट्लेवाड यांच्या शेतसर्वे नंबर 28 व 29 मधील आखाड्यावर बांधलेल्या वासरांवर हल्ला झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.


वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला लांडग्याने केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पैनगंगा नदीपात्रात पाण्याअभावी वन्य प्राणी मानवी वस्तीकडे व शिवाराकडे वळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


