
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील बस स्थानकात सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एसटी बसच्या चाकाखाली सापडून एका ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. उत्तम आबाजी वाघमारे (वय ७०, रा. पेवा, ता. हदगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम वाघमारे हे आपल्या गावाकडे जाण्यासाठी हदगाव बस स्थानकात आले होते. यावेळी भंडारा–औसा एसटी बस (क्रमांक MH 14 MH 2740) स्थानकात प्रवेश करत असताना, ते बसच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर अपघात झाला. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.



घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. संबंधित एसटी बस हदगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, बस चालकाविरोधात पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.



मयत उत्तम वाघमारे हे पेवा येथील शेतकरी कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या अचानक निधनामुळे वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.


दरम्यान, हदगाव बस स्थानकात येणाऱ्या एसटी बसचा वेग नियंत्रित ठेवावा तसेच चालकांनी अधिक सतर्कता बाळगावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानक परिसरात सुरक्षा उपाययोजना वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.
