
स्थानिक शेतकऱ्यांना खत नाकारून बाहेरील लोकांना पुरवठ्याचा आरोप; कृषी विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात खत टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून, खत वितरणातील कथित अनियमितते विरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. तालुक्यातील कृषी दुकानदार आणि कृषी विभागाच्या संगनमतातून स्थानिक शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवून काळाबाजार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केला आहे.


या निषेधार्थ सोमवारी (दि. ८ जून) रोजी हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर वामनराव पाटील वडगावकर यांनी तब्बल तासभर अर्धनग्न आंदोलन करत कृषी विभाग व खत विक्रेत्यांच्या कथित मनमानी कारभाराचा जाब विचारला. या आंदोलनाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत.


OTPच्या माध्यमातून खत वितरणात गैरव्यवहाराचा आरोप – तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपलब्ध झालेला हक्काचा खत साठा काही दुकानदारांकडून नातेवाईक व जवळच्या व्यक्तींच्या मोबाईलवर OTP घेऊन खत संपल्याचे कारण सांगत स्थानिक शेतकऱ्यांना खत नाकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना जादा दराने खत खरेदी करण्याची वेळ येत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. याशिवाय, तालुक्यातील खत साठा स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याऐवजी विदर्भातील काही भागातील नातेवाईक व मर्जीतील लोकांना पुरवठा होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.



“जा, जे करायचे ते करा” – शेतकऱ्यांचा अपमान? – आंदोलनावेळी काही शेतकरी खत टंचाई व वितरणातील अनियमिततेबाबत निवेदन देण्यासाठी कृषी कार्यालयात गेले असता, काही खत विक्रेत्यांकडून उर्मट व अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. “जा, जे करायचे ते करा” अशा भाषेत उत्तर देऊन शेतकऱ्यांच्या भावनांचा अपमान झाल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी श्रीराम साहेब यांची भेट घेतली असता, खत नियंत्रणासाठी नियुक्त कर्मचारी सध्या उपस्थित नसल्यामुळे तत्काळ कारवाई शक्य नसल्याचे सांगण्यात आले. या उत्तरामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले.
५० हून अधिक शेतकरी आंदोलनात सहभागी – प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने जवळपास ५० शेतकरी बांधवांनी कृषी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले असून, मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान व्रत्त लिहीपर्यंत शेतकऱ्यांसाठी तालुका कृषी अधिकारी यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नव्हते. यावरून कृषी अधिकारी, नियंत्रण अधिकारी व दुकानदार यांच्यात काहीतरी शिजते आहे या शेतकरी व आंदोलन कर्त्यांच्या आरोपात तथ्य आहे अशी जोरदार चर्चा शहर व तालुक्यात सुरु आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यात तालुक्यातील खत साठ्याची तात्काळ चौकशी करावी. स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्याने खत उपलब्ध करून द्यावे. बाहेरील भागात होणारी खत विक्री तात्काळ थांबवावी. दोषी दुकानदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे. अन्यथा “शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असा इशारा वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“शेतकरी भीक मागायला आलेला नाही, तो आपल्या हक्काचे खत मागतोय. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गप्प बसणार नाही. दोषींवर कारवाई आणि प्रत्येक शेतकऱ्याला खत मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील!” – वामनराव पाटिल वडगांवकर
