मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड

नांदेड | मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती संमेलनाच्या आयोजक प्रा. कल्पना गवरे यांनी दिली.

महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात संमेलन पार पडणार आहे.

या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन यांसारखे विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी साहित्यविश्वातील मान्यवरांसह रसिकांसाठी हे संमेलन विशेष आकर्षण ठरणार आहे.

मॉरिशसमधील मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, साहित्य अभ्यासक आणि रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याची माहिती नियोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी दिली. देवीदास फुलारी यांच्या निवडीमुळे नांदेड जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!