
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत दिनांक 8 ते 12 जून दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे.


तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण निश्चित होणार असून, यासाठी महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शासनाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिला व सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी दिली आहे.


आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या देखरेखीखाली संबंधित ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केला जाणार असून, सरपंच, सदस्य, राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यामध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये संभाव्य उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.


विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला आरक्षण व प्रभाग फेरबदलामुळे अनेक गावांमध्ये नेतृत्वात बदल होऊ शकतो, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.


दरम्यान, प्रशासनाने नागरिकांनी आरक्षण सोडतीवेळी उपस्थित राहून प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. आगामी काही दिवसांत आरक्षण निश्चित होताच गावागावातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
