पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्ड्यांवर धडक कारवाई

15 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल; 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

लातूर | नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जुगार व मटका अड्ड्यांवर धाडी टाकून एकूण 15 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 5 जून 2026 रोजी निलंगा शहरातील शिवाजी चौक परिसरात सुरू असलेल्या दोन मटका बुकी अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 24 हजार 320 रुपयांची रोकड, 43 हजार रुपयांचे सहा मोबाईल फोन आणि 48 हजार 600 रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 1 लाख 15 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

यानंतर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, शिरूर अनंतपाळ येथील हॉटेल युवराज बार समोरील नटू लंच होम येथे सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी जुगार खेळताना नऊ जण आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत 28 हजार 300 रुपयांची रोकड, 61 हजार रुपयांचे आठ मोबाईल फोन आणि 3 लाख रुपयांच्या सहा मोटारसायकली असा एकूण 3 लाख 89 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिन्ही कारवायांमध्ये पोलीस पथकाने एकूण 5 लाख 5 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

‘खबर’ हेल्पलाइनवर द्या माहिती

अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती 91 50 100 100 या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!