
मतभेद विसरून प्रत्येक नागरिकाने ‘एक घर-एक झाड’ संकल्प स्वीकारावा; शहर हरित करण्याचे आवाहन
लोहा | लोहा शहराला हरित, स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी तब्बल १ लाख ५१ हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला असून, ही केवळ सरकारी मोहीम न राहता लोकचळवळ बनावी, असे आवाहन विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांनी पुढाकार घेतल्यास येत्या काही वर्षांत लोहा शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लोहा येथील बाळाजी पाटील पवार मंगल कार्यालयात युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक श्याम पाटील व कुटुंबीयांच्या वतीने आयोजित ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहनअण्णा हंबर्डे, सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, बालाजी पाटील मारतळेकर, खुशाल पाटील पांगरीकर, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, उपसभापती सुधाकर कौन्सल्ये, उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, करिम शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आ. चिखलीकर म्हणाले की, नगराध्यक्ष शरद पवार व त्यांची टीम शहराच्या विकासासाठी चांगले काम करत आहे. लोहा शहर हरित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. या मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालये, दवाखाने, तहसील कार्यालय, नगरपालिकेचा परिसर, शाळा-महाविद्यालये, मोकळ्या जागा, नॅशनल हायवे, कंधार रोड, शहरातील रस्ते तसेच प्रत्येक घरासमोरील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली जाणार आहे.


“प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे. झाडे लावून त्यांची योग्य जोपासना केल्यास पुढील तीन ते चार वर्षांत लोहा शहर खऱ्या अर्थाने हरित शहर बनेल,” असे त्यांनी सांगितले.



यावेळी त्यांनी सांगितले की, नगरपालिका व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून झाडांना पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार असून, सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने लिंब, वड, पिंपळ यांसारखी सावली देणारी वृक्षे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या वृक्षारोपण मोहिमेद्वारे राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल, असेही आ. चिखलीकर यांनी नमूद केले.
यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी “प्रतापरावांसारखा नेता हा सावली देणाऱ्या वृक्षासारखा आहे, त्यांना जपले पाहिजे,” असे मत व्यक्त केले. तर प्रवीण पाटील चिखलीकर यांनी ‘धोंडे जेवण’ आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष शरद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी तर आभार प्रदर्शन भास्कर पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सर्वपक्षीय पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
