
5 व 8 जून रोजी वादळी वारे, मेघगर्जना आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नांदेड | नांदेड जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामानाचा जोरदार बदल पाहायला मिळण्याची शक्यता असून, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जिल्ह्यासाठी 5 जून व 8 जून 2026 रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


5 जून रोजी दुपारी 12:38 वाजता जारी करण्यात आलेल्या हवामान सूचनेनुसार, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वातावरण अचानक बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


वादळी हवामानात काय काळजी घ्याल?
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्यास अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा आणि घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत. मोकळ्या जागेत अडकल्यास सखल ठिकाणी बसून सुरक्षितता राखावी. विजेचे खांब, तारांचे कुंपण, लोखंडी वस्तू आणि पाण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.


या चुका जीवघेण्या ठरू शकतात…
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली आसरा घेणे, लोखंडी शेड किंवा तंबूमध्ये थांबणे, लँडलाईन फोन वापरणे, शॉवरखाली अंघोळ करणे किंवा विद्युत उपकरणे वापरणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच खिडकीतून किंवा उघड्या दारातून वीज पडताना पाहणेही टाळावे, कारण ते बाहेर उभे राहण्याइतकेच धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.


जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना आणि हवामान खात्याच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
