मरडगा येथे शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महसूल अधिकाऱ्यांसमोरच काठी, दगड व पाईपने मारहाण; पाच वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या वादाला हिंसक वळण

हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव तालुक्यातील मरडगा येथे शेतातील रस्त्याच्या जुन्या वादातून एका ५५ वर्षीय शेतकऱ्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काठी, दगड, पाईप व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी तब्बल १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. २६ मे २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास मरडगा येथे घडली. या प्रकरणातील फिर्यादी संभाजी किशनराव चौतमल (वय ५५) हे आपल्या शेतात असताना हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौतमल आणि शेजारील काळे कुटुंबीय यांच्यात शेतातील रस्त्यावरून गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयीन वाद सुरू आहे. संबंधित रस्त्याची पाहणी करण्यासाठी दि. २६ मे रोजी हदगाव तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी व महसूल कर्मचारी घटनास्थळी आले होते.

पाहणीदरम्यान महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने सध्या शेतातून रस्ता देता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले जाते. याचवेळी आरोपी उमेश पंजाब काळे हा काठी घेऊन घटनास्थळी आला आणि फिर्यादी संभाजी चौतमल यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. त्यानंतर इतर आरोपींनीही घटनास्थळी येत फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना काठी, दगड, लोखंडी पाईप तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात संभाजी चौतमल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हदगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी उमेश पंजाब काळे, देवीदास नामदेवराव काळे, बालाजी नागोराव काळे, पंजाब यादव काळे, गजानन बाबुराव निर्मल, विजय देवराव काळे, विजय बालाजी काळे, पुंजाजी यादवराव काळे, उत्तम नागोराव काळे, नामदेवराव नागोराव काळे, प्रेमानंद अवधूत काळे, योगेश पुंजाजी काळे, बाळू आनंदराव निर्मल, प्रकाश राघु काळे आणि परमेश्वर राघु काळे (सर्व रा. मरडगा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!