
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर विशेष मोहीम; प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर कारवाई, अनेक दुकाने सील


नांदेड | सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात धडक कारवाई मोहीम राबवत गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य अन्नसाठ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मागील आठवडाभर चाललेल्या या विशेष मोहिमेत लाखो रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल करून दुकाने सील करण्यात आली आहेत.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गोपनीय माहिती आणि नियमित तपासणीच्या आधारे जिल्ह्यात विविध भागांत अचानक छापे टाकण्यात आले.


दि. २९ मे रोजी नांदेडच्या जुना मोंढा परिसरातील एम. ए. शरीफ या आस्थापनाची तपासणी करून खुले रिफाईंड सोयाबीन तेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या संशयावरून सुमारे ७१८ किलो म्हणजेच १ लाख १४ हजार ८८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.


दि. ३० मे रोजी धनेगाव येथील रॉयल बेकरीमधून २५ हजार ८४० रुपयांचा ‘मिथ्याछाप’ मिल्क रस्कचा साठा जप्त करण्यात आला. माहूर येथील रहीम किराणा दुकानमधून खुले सोयाबीन तेलाचा नमुना घेऊन ५७ हजार २८० रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला. हदगाव येथील भैरूनाथ आईस्क्रीम अँड कुल्फी येथे अस्वच्छ वातावरणात व विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. तेथील कुल्फी व मिल्कशेकचे २३८ लिटर, सुमारे ५१ हजार ९०० रुपयांचे अन्नपदार्थ नमुने घेत नष्ट करण्यात आले.
दि. ३१ मे रोजी नांदेड, इस्लापूर आणि किनवट परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई करत गुटखा-पानमसाल्याचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. शोएब पान शॉप (देगलूर नाका, नांदेड), दुर्गा पान शॉप (इस्लापूर) आणि साईश्रद्धा पान शॉप (इस्लापूर) येथे छापे टाकून चार जणांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून दुकाने सील करण्यात आली आहेत.
मंगळवारी (दि. २ जून) जुना मोंढा येथील जयगोपाल कृष्णकुमार अँड कंपनी येथून १ हजार ३४८ किलो, सुमारे १ लाख ३ हजार ३४६ रुपयांचा ‘दिनार’ ब्रँडचा चनाबेसन कमी दर्जाचा आणि मिथ्याछाप असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला. तसेच किनवट येथील सैफ किराणा दुकानातून ४७ हजार ४४५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याचा साठा ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ही मोहीम अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अरुण तम्मडवार, अ. नं. गिरी, शिल्पा श्रीरामे, अमृता दुधाटे, बालाजी सोनटक्के यांच्या पथकाने सहायक आयुक्त संजय चटटे, रा. मा. भरकड आणि विभागीय सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
