“विधानपरिषदेच्या १७ ही जागा महायुतीच जिंकणार”; नांदेडमधून ताकद दाखवण्याचे अशोकराव चव्हाण यांचे आवाहन

महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

नांदेड, प्रतिनिधी | महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषदेच्या सर्व १७ जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचा विजय निश्चित असून, नांदेडमधून महायुतीची ताकद आणि एकजूट राज्याला दाखवून द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोमवारी (दि. १ जून) आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने अनुभवी नेतृत्व म्हणून अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले. “ही निवडणूक केवळ विजयासाठी नाही, तर महायुतीची आन-बाण-शान सिद्ध करण्यासाठी आहे. सर्वांनी एकजुटीने काम करून अमरनाथ राजूरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत बोलताना अशोकराव चव्हाण यांनी अमरनाथ राजूरकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “राजूरकर यांची पक्षातील पदाधिकाऱ्यां सोबतच नगरपालिका सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी थेट नाळ जोडलेली आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची आणि स्थानिक प्रश्नांवर मार्ग काढण्याची त्यांची हातोटी पक्षासाठी मोठी ताकद आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अॅड. श्रीजयाताई चव्हाण, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, अॅड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, राष्ट्रवादीचे नेते कैलास गोरठेकर, शिवसेनेचे पदाधिकारी व इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर उत्साही वातावरणात अमरनाथ राजूरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना महायुतीचे प्रमुख नेते, नगराध्यक्ष भगवान दंडवे, शंकर बोलमवार, संतोष कुलकर्णी, तुलजेस यादव, संदीप गाडीवाले, योगेश मुंढे, राजेश्वर देशमुख, मोईज भाई, विश्रांती कदम, शकुंतला मुदीराज यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!