
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांमध्ये जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची भावना असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, याचे उत्तम उदाहरण संगमवाडी गावातील पाच युवकांनी दाखवून दिले आहे. पवन परमेश्वर घुगे, लखन परमेश्वर घुगे, ऋषिकेश मारुती घुगे, कृष्णा बाबुराव घुगे आणि शिवदास मारुती तिडके या पाच युवकांची भारतीय सैन्यात (इंडियन आर्मी) निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या यशस्वी युवकांच्या गौरवार्थ गावात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून या युवकांनी केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण संगमवाडी गावाचे नाव उंचावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


संगमवाडी हे गाव शिक्षण, क्रीडा तसेच विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे परिसरात विशेष ओळख निर्माण करत आहे. या गावातील अनेक युवक पोलीस दल, वनविभाग, भारतीय सैन्य तसेच इतर शासकीय विभागांमध्ये यशस्वीपणे सेवा बजावत आहेत. त्यामुळे गावात देशसेवा आणि समाजसेवेची प्रेरणादायी परंपरा निर्माण झाली आहे.


या सत्कार समारंभाला सरपंच चक्रधर घुगे, माजी सरपंच नामदेव केंद्रे, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, माजी सरपंच दगडोबा घुगे, माजी सरपंच माधवराव घुगे, सीआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे, मेजर कृष्णा केंद्रे, मेजर आदिनाथ घुगे, गजानन चव्हाण, भानुदास घुगे, आरोग्य सेवक रामचंद्र घुगे, परमेश्वर घुगे, मारोती घुगे, प्रभाकर केंद्रे यांच्यासह गावातील महिला, पुरुष आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


यावेळी बोलताना मान्यवरांनी युवकांच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश मिळविता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले. सैन्यात निवड झालेल्या युवकांनीही आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्याला दिले.

संगमवाडी गावातून एकाच वेळी पाच युवकांची भारतीय सैन्यात निवड होणे ही अत्यंत गौरवास्पद बाब मानली जात आहे. या यशामुळे गावातील इतर युवकांनाही सैन्य, पोलीस, वनरक्षक आणि इतर शासकीय सेवांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे. युवकांच्या या यशाने संपूर्ण गावाचा आत्मविश्वास वाढला असून संगमवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
