
६ सप्टेंबरला राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळाव्याची घोषणा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप


नांदेड, प्रतिनिधी| अखिल भारतीय पद्मशाली संघम, हैदराबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभेअंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली समाज संघटनेच्या प्रौढ, युवक व महिला संघटनेचा कार्यकारिणी विस्तार व प्रबोधन मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. भर उन्हाची व उकाड्याची तमा न बाळगता जिल्हाभरातून समाजबांधव, महिला व युवकांनी विक्रमी उपस्थिती लावत समाज एकजुटीचे प्रभावी दर्शन घडविले.


या मेळाव्यात समाजाच्या संघटनात्मक बळकटीसह शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजबांधव व पालकांच्या मागणीचा आदर करत येत्या रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कौठा (नांदेड) येथे राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मराठवाडा युवक संघटनेचे अध्यक्ष व समाजभूषण गोविंदशेठ कोकुलवार यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हा सभागृह परिसर विनामूल्य उपलब्ध करून दिला असल्याची माहिती देण्यात आली.


मेळाव्यातील उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सभागृह अपुरे पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेकडो कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर उभे राहून कार्यक्रम ऐकावा लागला. या प्रतिसादामुळे भविष्यातील कार्यक्रम अधिक मोठ्या व विस्तीर्ण सभागृहात आयोजित करण्याचा शब्द आयोजकांनी दिला.


यावेळी महाराष्ट्र राज्य मजूर संस्थेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल लक्ष्मीकांत गोणे यांचा समाजाच्या वतीने फेटा बांधून व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील कार्यकर्ते रुक्माजी बालाजी यलगंद्रेवार यांची नांदेड दक्षिण पद्मशाली प्रौढ संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात येऊन त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा पद्मशाली महासभेचे अध्यक्ष डॉ. मारोतराव क्यातमवार होते. त्यांनी समाज संघटन ही काळाची गरज असल्याचे सांगत युवकांनी नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. तर अखिल भारतीय पद्मशाली संघमचे गौरव अध्यक्ष श्रीधरराव सुंकरवार यांनी समाजाने शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय पद्मशाली संघमचे उपाध्यक्ष प्रल्हादराव सुरकुटवार, सचिव व्यंकटेश जिंदम, मर्कंडेय बँकेचे अध्यक्ष अशोकशेठ श्रीमनवार, डॉ. गोविंदराव ईपकलवार, सौ. विजयाताई सुंकरवार, सौ. कविताताई गड्डम, नागभूषण दुर्गम, नगरसेवक नागनाथ गड्डम, बुरला पेंटया, संग्राम निलपत्रेवार, संतोष कोंकलवार, शिवाजी अन्नमवार, भारत गट्टेवार, सौ. ललिता निलपत्रेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी अन्नमवार यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर संग्राम निलपत्रेवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध तालुक्यांतील नूतन पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. महिला पदाधिकारी, युवक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या मेळाव्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमानंतरही कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण कायम असल्याचे दिसून आले.
