₹4 हजार द्या… मगच पाणी कनेक्शन घ्या?” — हिमायतनगरात नळजोडणीवर विना पावती वसुलीचा आरोप

पाणीपुरवठा योजना जनतेसाठी की ठेकेदार–पदाधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी? नागरिकांमध्ये संताप; ₹22 लाखांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात नव्याने सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरगुती नळ कनेक्शन देताना प्रत्येक लाभार्थ्याकडून तब्बल ₹4,000 रोख रक्कम घेतली जात असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, रक्कम भरल्याशिवाय खोदकाम, जोडणी अथवा पुढील प्रक्रिया होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाची पाणीपुरवठा योजना नागरिकांसाठी आहे की काहींच्या आर्थिक फायद्यासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.

हिमायतनगर शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुमारे सात–आठ वर्षांपूर्वी 19 कोटींपेक्षा अधिक निधीची नळयोजना मंजूर करण्यात आली होती. मात्र कामाच्या संथ गतीमुळे आणि दर्जाबाबत यापूर्वी झालेल्या आरोपांमुळे ही योजना अनेकदा चर्चेत राहिली. एवढा मोठा खर्च होऊनही नागरिकांना आजवर या योजनेतून नियमित पाणी मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

मात्र आता ही नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी नवनिर्वाचित सत्ताधाऱ्याकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील जुन्या नळ कनेक्शन धारकांनाही नवीन पाईपलाईनवर जोडणी घेण्यासाठी ₹4,000 जमा करण्यास सांगितले जात आहे. मात्र, अनेक प्रकरणांत या रकमेची अधिकृत पावती दिली जात नसल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजपर्यंत अंदाजे 550 नळ कनेक्शन देण्यात आले असल्याचे सांगितलं जात असून,₹4,000× 550 = ₹22,00, 000 (बावीस लाख रुपये) इतकी मोठी रक्कम जमा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांनी सार्वजनिक पाणीपुरवठा नळ योजनेच्या कनेक्शनसाठी घेतल्या जाणाऱ्या रकमेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी आर्थिक वसुली होत असल्याबाबत साशंकता त्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच, नळ कनेक्शनसाठी खोदकाम करताना मशीन चालविण्यासाठी संबंधित घरमालकांच्या घरातील वीज कनेक्शनचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाला अंदाजे दोन ते पाच युनिट वीज खर्चाचा अतिरिक्त आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रक्रियेबाबत नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट खुलासा करून नागरिकांची होत असलेली कथित आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणीही वामनराव पाटील वडगांवकर यांनी केली आहे.

ही रक्कम नगरपंचायतीकडून अधिकृतपणे आकारली जात आहे का? जर अधिकृत असेल तर पावती का दिली जात नाही? नागरिकांकडून जमा झालेल्या रकमेचा लेखा-जोखा कुठे आहे? खोदकामासाठी नागरिकांच्या घरातील वीज कनेक्शनचा वापर का केला जात आहे? काही नागरिकांकडून 4 हजार रुपये घेऊन केवळ 2 हजार रुपयाची नळजोडणी फीस नावाची पावती दिली जात असून, त्यावर केवळ लिपिकाची स्वाक्षरी असून, प्राधिकृत अधिकारी, लेखपाल/रोखपाल यांची स्वाक्षरी नसल्याचे आर्थिक व्यवहारात हेराफेरीची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना “पाणी हा मूलभूत हक्क आहे की आर्थिक व्यवहाराचा विषय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Oplus_16908288

या संपूर्ण प्रकाराबाबत नगरपंचायत प्रशासन स्पष्टीकरण देणार का? शहरात ऐन उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात नळजोडणी दिली जातं असून, यासाठी 4 हजार प्रती कनेक्शन घेतले जात असल्या विषयीची चर्चा वाढत असताना, “पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की आर्थिक व्यवहाराचा विषय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या आरोपांबाबत नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी, आणि शासनाने 19 कोटी पेक्षा अधिक रक्कम खर्च करून राबविलेल्या नळ योजनेचा फायदा सर्व सामान्य साठी की ठेकेदार आणि नगरपंचायतीत बसलेल्या पदाधिकाऱ्यांची खिसे भरण्यासाठी आहे का ..? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हिमायतनगर नगरपंचायतचा कारभार प्रभारी अधिकारी यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

(टीप : बातमीत नमूद बाबी या नागरिक व संबंधित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या आरोप व चर्चांवर आधारित असून, नगरपंचायत प्रशासनाची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!