सोनारी फाट्यावरील टोलनाक्यावर सुविधांचा अभाव; भेगाळलेल्या रस्त्यावर वसुली सुरू असल्याने संताप

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय कुलूपबंद; नियम धाब्यावर बसवून टोलवसुलीचा आरोप
हिमायतनगर | हिमायतनगर–भोकर मार्गावरील सोनारी फाट्याजवळ सुरू करण्यात आलेल्या टोलनाक्यावर मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, रस्त्याची दयनीय अवस्था असतानाही टोलवसुली मात्र जोमाने सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, टोलनाक्यावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, तर शौचालयाला कुलूप लावलेले असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याशिवाय, भोकर–हिमायतनगर अंतर्गत सिमेंट रस्त्यावर जागोजागी भेगा व खड्डे पडले असूनही टोल आकारला जात असल्याचा आरोप होत आहे.
“रस्ता खराब, सुविधा गायब… मग टोल कशासाठी?”
नागरिकांचा सवाल आहे की, रस्त्याची दुरवस्था, पाणीटंचाई, शौचालय सुविधा बंद आणि मूलभूत सोयींचा अभाव असताना टोलनाक्याला परवानगी कशी देण्यात आली? शासनाच्या नियमानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यापूर्वीच टोलवसूली सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
वृक्षतोडीनंतर वृक्षलागवडीचा विसर?
राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली, मात्र त्याऐवजी अपेक्षित प्रमाणात वृक्षलागवड व संगोपन न झाल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः टोलनाक्याजवळ एकही झाड नसल्याने प्रवाशांना उन्हाचा सामना करावा लागत आहे. स्थानिक स्तरावर अशीही चर्चा आहे की, टोलनाक्यावर अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांनी तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती, भेगा बुजवणे, वृक्षलागवड, पाणी व स्वच्छतागृहासह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच टोलवसुलीला परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
(टीप : बातमीत नमूद बाबी या स्थानिक नागरिक व प्रवाशांनी व्यक्त केलेल्या आरोप व चर्चांवर आधारित असून संबंधित प्रशासनाची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!