
तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश; ‘संवेदना’ पोर्टलद्वारे पुढील कार्यवाही
नांदेड | नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करणे तसेच पोलीस–नागरिक संवाद अधिक बळकट करून जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना थेट पोलीस उप महानिरीक्षकांसमोर आपली व्यथा मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.


नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या पोलीस कामगिरीचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक नियमितपणे जिल्हा मुख्यालयांना भेट देत असून, याच पार्श्वभूमीवर दि. ३० मे रोजी नांदेड येथे जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत झालेल्या संवादादरम्यान तब्बल ३७ तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे सादर केले. यामध्ये मालमत्ता विषयक वाद, हरवलेले व्यक्ती, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय यांसह विविध स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता. तसेच उपस्थित नागरिकांनी पोलीस कामकाजाबाबत विविध अपेक्षाही व्यक्त केल्या.


प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.



तक्रारदारांच्या अर्जांचा जलद निपटारा व्हावा यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयामार्फत ‘संवेदना’ तक्रार निवारण प्रणाली यापूर्वीच सुरू करण्यात आली असून, ‘जनसंवाद’मध्ये प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी ‘संवेदना’ पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक तक्रारीवरील कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
