
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथे १ जून रोजी ‘माती वाचवा, शेती जगवा’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| रासायनिक खतांच्या अवाजवी व असंतुलित वापरामुळे जमिनीची सुपीकता घटत असून उत्पादन खर्चात वाढ होत आहे. याचबरोबर अन्नधान्यातील रासायनिक अवशेषांमुळे कर्करोगासह (कॅन्सर) विविध गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


या पार्श्वभूमीवर “संतुलित खत वापर ही काळाची गरज” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी पळसपूर येथे ‘माती वाचवा, शेती जगवा’ शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


कृषी विभाग, हिमायतनगर व कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दि. १ जून २०२६, सोमवार रोजी सकाळी ९ वाजता नागनाथ मंदिर, पळसपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.


या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी येथील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ प्रा. कल्याणकर सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देवीकांत देशमुख, तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग हिमायतनगर हे उपस्थित राहून शेतकऱ्यांना माती परीक्षण, संतुलित खत वापर, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय व शाश्वत शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.



शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण पाटील यांनी केले आहे.
