कृत्रिम खत टंचाईबाबत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याशी वामनराव पाटलांनी केली महत्त्वपूर्ण चर्चा; सखोल चौकशीचे आश्वासन

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात निर्माण झालेल्या कृत्रिम खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी महायुतीचे लोकप्रिय लोकनेते तथा आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांची सदिच्छा भेट घेऊन शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी वामनराव पाटील वडगावकर यांनी अनेक खत विक्रेते “खत उपलब्ध नाही” असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा मुद्दा आमदारांच्या निदर्शनास आणून दिला. दुसरीकडे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खताचा साठा गोडाऊनमध्ये असल्याची माहिती समोर येत असल्याने अशा गोडाऊनची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच, शासनाकडून तालुक्याच्या क्षेत्रफळानुसार येणारा खतसाठा इतरत्र वळवला जाऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून काही दुकानदारांकडून खत विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट व दिशाभूल करत असल्याची बाब देखील आमदारांच्या कानावर घालण्यात आली.

शेतकरी हितासाठी करण्यात आलेल्या तक्रारींमुळे काही दुकानदारांकडून दलालामार्फत दबाव व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सकारात्मक भूमिका घेत कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

तसेच, “या लढ्याचा फायदा शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शेतकरी हितासाठी तुम्ही करत असलेल्या कामात मीही सहकार्य करेन,” असा शब्द आमदारांनी दिल्याचे वामनराव पाटील वडगावकर यांनी सांगितले.

शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठीचा हा लढा पुढेही अधिक ताकदीने सुरू राहणार असून, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!