
ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जूनपर्यंत मुदत
नांदेड| वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि तंत्र विद्यालय, नांदेड येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 जून 2026 आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून विद्यार्थी अधिकृत प्रवेश संकेतस्थळ येथे अर्ज करू शकतात.


राज्य शासनाने 18 मे 1972 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचा विद्यापीठ कार्यक्षेत्रात समावेश आहे. विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तीन प्रमुख शाखांपैकी निम्नस्तर कृषि शिक्षण शाखेअंतर्गत शासकीय, अनुदानित आणि खाजगी कृषि तंत्र विद्यालये कार्यरत आहेत.


कृषि तंत्र विद्यालय नांदेडची स्थापना 15 ऑक्टोबर 1963 रोजी झाली असून हे विद्यालय उच्च दर्जाचे आणि नावाजलेले तंत्र विद्यालय म्हणून ओळखले जाते.


भारत हा शेतीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाद्वारे युवक-युवतींना आधुनिक शेती व्यवस्थापन, पीक संवर्धन, पीक संरक्षण, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, फळे व भाजीपाला उत्पादन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, शेतमाल प्रक्रिया, विपणन आदी विषयांचे प्रात्यक्षिकाधारित शिक्षण दिले जाते.


या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान, उत्पादन ते विक्री व्यवस्थापन तसेच स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाते. कृषि पदविकाधारकांना कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, कालवा निरीक्षक, कृषि शिक्षक तसेच कृषि सेवा केंद्र चालक म्हणूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
नांदेड कृषि तंत्र विद्यालयाची वैशिष्ट्ये
- उच्च शिक्षित कर्मचारी वर्ग
- सुसज्ज व्याख्यानगृहे व परिसर
- विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष
- प्रशस्त इमारत व भव्य क्रीडांगण
- नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यालय
- कृषि महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या सलग्नतेचा लाभ अशी माहिती कृषि तंत्र विद्यालय, नांदेडचे प्राचार्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
