पाणीटंचाईवर ‘श्रमदानाचा’ उपाय; नगराध्यक्ष स्वतः उतरले बंधाऱ्यात

मंगरूळ बंधाऱ्यातील अडथळा दूर करून विहिरीपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न; शहराच्या नळयोजनेला मिळणार गती

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| उष्णतेचा पारा 42 अंश डिग्री सेल्सिअस वर असताना तळपत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या हिमायतनगर शहरवासीयांसाठी दिलासादायक घडामोड घडली असून, शहराच्या पाणीप्रश्नावर तात्पुरता का होईना मार्ग काढण्यासाठी नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले असून, तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंगरूळ बंधाऱ्यातून विहिरीकडे जाणाऱ्या पाण्याचा अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः श्रमदान करत पुढाकार घेतला आहे.

विदर्भ–मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवरील मंगरूळ बंधाऱ्यातून हिमायतनगर शहरासाठी सुमारे 19. 39 कोटी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा नळयोजना उभारण्यात आली आहे. या योजनेचे बहुतांश काम पूर्णत्वास आले असले तरी बंधाऱ्यातील पाणी विहिरीपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांनी स्वतः मंगरूळ बंधाऱ्यावर भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी कोणताही विलंब न करता हातात खोरे व टोपले घेत विहिरीकडे जाणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी श्रमदान केले. त्यांच्या या कृतीमुळे पाणी विहिरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुरळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शहरातील विविध प्रभागांमध्ये नळ जोडणीसह पाईपलाईन टाकण्याचे कामही प्रगतीपथावर असून, बंधाऱ्यातील पाणी विहिरीमार्गे शहराच्या नळयोजनेपर्यंत पोहोचल्यास नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष स्वतः श्रमदान करून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढे सरसावल्याचे पाहून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जात आहे.

Oplus_16908288

या नळ योजनेचे काम गत पाच ते सात वर्षापासून सुरू आहे. मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी व प्रभारी मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या प्रमुख समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने आज घडीला ही योजना पूर्णत्वाची वाट पाहत आहे. या नळ योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्याची पूर्णतः वाट लागली असून किमान आता तरी ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत होऊन शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या कायमस्वरूपी प्रश्न सुटेल का..? याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!