खरीपासाठी नांदेड जिल्ह्यात मुबलक खतसाठा उपलब्ध

अफवांवर विश्वास ठेवू नका; गरजेनुसारच खत खरेदी करा – कृषी विभागाचे आवाहन

नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी नांदेड जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खत टंचाईच्या भीतीपोटी अनावश्यक खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार, जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार तसेच पिकांच्या वाढीच्या टप्प्यानुसार खतांचा वापर करावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

खत उपलब्धतेबाबत अफवा पसरवल्या जात असल्यास, जादा दराने विक्री, खतासोबत अन्य वस्तूंची सक्ती (लिंकिंग) किंवा बोगस खतांची विक्री आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खरीप हंगामात खत ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कृषी निविष्ठा मानली जाते. राज्यस्तरावर कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून खत नियोजन केले जाते. नांदेड जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 मध्ये सुमारे 2 लाख 11 हजार 500 मेट्रिक टन खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे. यात 60 हजार 200 मे.टन युरिया, 32 हजार 300 मे.टन डीएपी आणि 85 हजार 300 मे.टन संयुक्त खतांचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, मागील वर्षीचा शिल्लक साठा आणि 1 एप्रिलपासून झालेल्या पुरवठ्याचा विचार करता बाजारात 31 हजार 098 मे.टन युरिया उपलब्ध होता. त्यापैकी 14 हजार 597 मे.टन युरियाची विक्री झाली असून सध्या 16 हजार 502 मे.टन युरिया उपलब्ध आहे.

त्याचप्रमाणे 19 हजार 275 मे.टन डीएपी खतापैकी 7 हजार 600 मे.टन विक्री झाली असून बाजारात अजूनही 11 हजार 674 मे.टन डीएपी उपलब्ध आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे डीएपी खताचा पुरवठा तुलनेने कमी असला तरी 20:20:0:13 आणि 12:32:16 यांसारखी संयुक्त खते पर्याय म्हणून वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 67 हजार मे.टन संयुक्त खतांसह एकूण 1 लाख 25 हजार 500 मे.टन खतांचा साठा उपलब्ध असल्याचे विभागाने सांगितले.

दरम्यान, संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अखंडित खत पुरवठा करता यावा यासाठी ‘बफर स्टॉक’ अर्थात संरक्षित खतसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संरक्षित साठ्यात सध्या 4 हजार 28 मे.टन युरिया आणि 1 हजार 485 मे.टन डीएपी खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!