महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ अभियान सुरू

राज्यातील सुमारे 9.86 कोटी मतदारांच्या नोंदींची होणार प्रत्यक्ष पडताळणी

नांदेड| भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून देशभरातील मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (Special Intensive Revision) करण्याचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्राचा या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

यापूर्वी देशात 1952-56, 1957, 1961, 1965-66, 1983-84, 1987-89, 1992-95 आणि 2002-04 या कालावधीत विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात आले होते. मागील 20 वर्षांत केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण झाले असून मोठ्या प्रमाणात स्थलांतर, नव्या नोंदी आणि वगळण्या झाल्याने मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि तिचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 21 नुसार निवडणूक आयोगाला विशेष सखोल पुनरिक्षण करण्याचे अधिकार आहेत.

या मोहिमेत राज्यातील एकूण 9,86,44,413 मतदारांच्या तपशीलांची पडताळणी 1,00,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून नियुक्त मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) सहकार्य करणार आहेत. महाराष्ट्रात ही प्रक्रिया जून 2026 पासून सुरू होऊन ऑक्टोबर 2026 मध्ये पूर्ण होणार आहे.

प्रमुख टप्पे पुढीलप्रमाणे :

  • 20 ते 29 जून 2026 – गणना अर्जांची छपाई व BLO प्रशिक्षण
  • 30 जून ते 29 जुलै 2026 – घरभेटीद्वारे गणना अर्जांचे वाटप व संकलन
  • 5 ऑगस्ट 2026 – प्रारूप मतदार याद्यांचे प्रकाशन
  • 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 – दावे व हरकती नोंदविणे
  • 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत – दावे व हरकतींचा निपटारा
  • 7 ऑक्टोबर 2026 – अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन

घरभेटीद्वारे माहिती संकलन

30 जून ते 29 जुलै या कालावधीत BLO घरोघरी जाऊन पूर्वभरलेले गणना प्रपत्र मतदारांना देणार आहेत. या प्रपत्रात सध्याची मतदार माहिती तसेच 2002-2004 मधील विशेष सखोल पुनरिक्षणातील संबंधित मतदार किंवा त्यांच्या आई-वडील/आजी-आजोबा यांच्या नोंदींचा तपशील समाविष्ट असेल. मतदारांना नवीन छायाचित्रही सादर करता येणार आहे.

सध्या मतदारांची जुळवणी जुन्या मतदार याद्यांशी करण्याचे काम सुरू असून राज्यात आतापर्यंत 72.04 टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. मतदारांना आपली किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांची जुनी माहिती भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध करून घेता येणार आहे. भारत निवडणूक आयोग मतदार सेवा पोर्टल या संकेतस्थळावर राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि पूर्ण नाव टाकून जुन्या नोंदी शोधता येतील. ही माहिती जतन करून BLO यांच्या गृहभेटीदरम्यान उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घर बंद असल्यास तीन वेळा भेट

गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास BLO संबंधित घराला किमान तीन वेळा भेट देतील. योग्यरीत्या भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र पुन्हा भेट देऊन स्वीकारले जाईल. मतदारांना ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेही पूर्ण करता येणार आहे.

त्रुटी आढळल्यास नोटीस

ज्या मतदारांची नोंद जुनी माहितीशी जुळणार नाही किंवा त्रुटी आढळतील, त्यांना मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस पाठवली जाईल. अशा मतदारांची यादी संभाव्य कारणांसह स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, तहसील कार्यालय तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. नोटीस प्राप्त मतदारांना आवश्यक कागदपत्रांची यादी गणना प्रपत्राच्या मागील बाजूस देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य राहील; नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ते मान्य होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांनाही आवाहन

मतदार यादीतील दुबार नावे व मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नव्या पात्र मतदारांची नोंदणी पारदर्शकपणे करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर BLA नियुक्त करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत केवळ 1,13,558 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून सर्व पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकाधिक प्रतिनिधी नियुक्त करावेत, असे निवडणूक कार्यालयाने म्हटले आहे. लवकरच या विषयावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!