२७ मे रोजी धडक ठिय्या आंदोलन; “शासनाचा पगार घेता, मग मुख्यालयी राहायला लाज वाटते का?”

हिमायतनगरमधील ‘मुजोर’ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात २७ मे रोजी धडक ठिय्या आंदोलन; हलगी वाजवत केला जाणार निषेध
हिमायतनगर,अनिल मादसवार | तालुक्यातील विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेरून ये-जा करत असल्याने सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची कामे रखडत असल्याचा संतापजनक आरोप पुढे आला आहे. या कथित निष्काळजी, मुजोर व सुस्त प्रशासनाविरोधात बुधवार, दि. २७ रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयावर “धडक ठिय्या व हलगी बजाव स्वागत आंदोलन” छेडण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ गायकवाड यांनी दिली.

“शासनाचा लाखोंचा पगार आणि घरभाडे भत्ता घेतात, मग मुख्यालयी राहायला लाज वाटते का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. तालुक्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी नांदेडसह इतर शहरांतून आरामशीर ये-जा करत असल्याने कार्यालये वेळेवर सुरू होत नाहीत, परिणामी ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांची कामे दिवसन्‌दिवस रखडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, छोट्या दाखल्यासाठीही नागरिकांना अनेक दिवस कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीअभावी फाईली आठवडोन्‌आठवडे प्रलंबित राहतात. त्यामुळे गरीब जनतेचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत असून प्रशासनाकडून जनतेचा अप्रत्यक्ष छळ सुरू आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

याबाबत बोलताना राजूभाऊ गायकवाड म्हणाले, “जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि मुख्यालयी न राहता शासकीय नियम धाब्यावर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांना आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. हलगी वाजवत निषेध करून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला जाईल.” या आंदोलनात शेतकरी, कष्टकरी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. “अन्यायाविरुद्ध विद्रोह… हक्कासाठी संघर्ष!” या घोषवाक्यासह होणाऱ्या आंदोलनाकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!