भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने लक्ष्मणराव भवरे यांचा गौरव

आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते नाशिक येथे सन्मान; सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा गौरव
नांदेड | सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे कामारीकर यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

नाशिक येथील समुद्र लॉन्स येथे ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने शनिवारी (दि. 23 मे) देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, इंदू मिल स्मारकाचे प्रणेते व रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते लक्ष्मणराव भवरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुशील सूर्यवंशी, राज्य प्रवक्ते अविनाश शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर उमराळकर, निसर्गोपचार तज्ञ रावसाहेब घोडेस्वार, माजी सभापती संजय साबळे, पत्रकार संजय डोंगरे, अभिनेत्री आसावरी बर्वे, संस्थेचे अध्यक्ष अनिल आठवले, सचिव मिलिंद कळवणकर तसेच सुप्रसिद्ध निवेदिका व पत्रकार अश्विनी पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

लक्ष्मणराव भवरे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर परखडपणे मांडण्याचे काम केले आहे. तसेच भारतीय संविधानाचा प्रचार-प्रसार, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना लक्ष्मणराव भवरे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने, त्यांच्या नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असून सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे.” या पुरस्काराबद्दल नांदेड जिल्ह्यासह विविध सामाजिक, पत्रकारिता व राजकीय क्षेत्रातून लक्ष्मणराव भवरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!