चिंचगव्हाण येथे आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांची जनगणना कामाची पाहणी

अचूक व पारदर्शक जनगणना ही विकासाच्या नियोजनाचा पाया; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| भारत सरकारच्या वतीने सुरू असलेल्या घरयादी व घरगणना कार्याची पाहणी करण्यासाठी आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांनी चिंचगव्हाण गावाला भेट देत जनगणना प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी गावात सुरू असलेल्या जनगणना कामाची माहिती त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली.

यावेळी आमदार कदम-कोहळीकर यांनी जनगणना प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह जनगणना ही शासनाच्या विकास आराखड्याचा पाया असते. गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.”

तसेच, शासनाच्या विविध योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर विकास कामांचे नियोजन जनगणनेतील आकडेवारीवर आधारित असते, त्यामुळे नागरिकांनी कोणतीही माहिती लपवू नये किंवा चुकीची देऊ नये, असे आवाहनही त्यांनी गावकऱ्यांना केले.

या पाहणी दौऱ्यात स्वीय सहाय्यक बबन कदम, जनगणना अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. आमदारांनी जनगणना कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे कौतुक करत कार्य अचूक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!