इस्लापूर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बोलेरो पिकअपसह प्रतिबंधित पानमसाला जप्त

ऑपरेशन क्रॅकडाऊन : २७ लाखांचा गुटखा साठा जप्त; हिमायतनगरसह तिघांविरुद्ध गुन्हा
किनवट/नांदेड| नांदेड जिल्हा पोलिसांच्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत इस्लापूर पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधीत जर्दा व तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनासह एकूण २७ लाख १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हिमायतनगर येथील दोघांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने २४ मे रोजी इस्लापूर हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे कोसमेट शिवारात आर्या बारजवळ सापळा रचला.

यावेळी MH 26 CH 0264 क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता, वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला, जर्दा व तंबाखूचा तब्बल १७ लाख १ हजार २५० रुपयांचा साठा आढळून आला. यासोबतच १० लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करून एकूण २७ लाख १ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी चालक सय्यद मोहम्मद अली सय्यद सादिक (वय २१, रा. रहिम कॉलनी, हिमायतनगर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हा माल सय्यद अमेर सय्यद खमर (रा. रहिम कॉलनी, हिमायतनगर) याचा असून, शेख मझहर (रा. सवर्णा, जि. निर्मल, तेलंगणा) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली.

यावरून तिघांविरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७१/२०२६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!