आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड| महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८ मेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिचा भंग होणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश Rahul Kardile यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघासाठी १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान होणार असून मतमोजणी २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

आचारसंहितेच्या कालावधीत दुष्काळ, पाणीटंचाई किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या अत्यावश्यक परिस्थिती वगळता नवीन शासकीय जाहिराती, नवीन कामांना मान्यता किंवा उद्घाटने करता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा किंवा कार्यालयांमध्ये राजकीय बैठका घेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही काम या कालावधीत करू नये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही योजना किंवा राजकीय व्यक्तींची छायाचित्रे ठेवू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती देत मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांचे सदस्य मतदार राहणार नसल्याचे सांगितले. बैठकीपूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतही बैठक घेण्यात आली. मतदान प्रक्रिया, प्रचार नियम, परवानग्या तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनांबाबत यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!