
ऑपरेशन क्रॅकडाऊनचा मोठा फटका! 703 घातक शस्त्रांसह 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नांदेड | नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध शस्त्र तस्करीवर पोलिसांनी मोठा घाव घालत ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत धडाकेबाज कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून तब्बल 703 अवैध शस्त्रांचा साठा जप्त केला असून, 14 लाख 4 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई उभी केली.


मिळालेल्या माहितीनुसार, देना बँक ते सचखंड गुरुद्वारा रोडवरील ‘300 सालाना शॉपिंग प्लाझा’मधील दुकान क्रमांक 08 मध्ये विनापरवाना तलवारी, खंजीर आणि इतर धारदार शस्त्रांचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या उपस्थितीत धाड टाकली.



मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दुकान मालक रणजितसिंघ रामसिंघ सरदार (रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड) हा घटना स्थळावरून फरार झाला. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता 470 तलवारी (किंमत ₹12.31 लाख), 209 खंजीर/चाकू (किंमत ₹1.70 लाख) आणि 24 फायटर/पंच (किंमत ₹2,400) असा 703 घातक शस्त्रांचा साठा आढळून आला.



या कारवाईत एकूण ₹14,04,300 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही शस्त्रे नेमकी कुठून आली? कोणाला विकली जाणार होती? आणि यामागे मोठे रॅकेट तर नाही ना? याचा तपास आता पोलीस करत आहेत. “703 घातक शस्त्रांचा साठा जप्त; ऑपरेशन क्रॅकडाऊनमुळे अवैध शस्त्र विक्रेत्यांचे धाबे दणाणले!” अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
