
१५ आरोपी जाळ्यात, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड, विशेष प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मटका-जुगार अड्ड्यांवर मोठा घाव घातला आहे. नांदेडच्या शिवाजीनगर भागात दोन आणि हिमायतनगर परिसरात एक अश्या तीन ठिकाणी एकाचवेळी धाड टाकत तब्बल १५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, १ लाख ३० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असून, मटका-जुगार, अंमली पदार्थ, धारदार शस्त्रे आणि बेकायदेशीर व्यवहारांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत मटका-जुगार अड्डे उद्ध्वस्त केले.


नांदेडच्या शिवाजीनगरात दोन ठिकाणी मटक्यावर धाड


२१ मे रोजी शिवाजीनगर हद्दीतील नवीन मोंढा परिसरात संतोष बीज भांडारसमोरील मोकळ्या जागेत मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत आरोपींना ताब्यात घेतले. याठिकाणी जुगार साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करत तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याच दिवशी नई आबादी भाजी मार्केट चौकात सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर दुसरी धडक कारवाई करत पोलिसांनी आणखी काही जणांना रंगेहात पकडले. या प्रकरणात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
हिमायतनगरात ‘तिरंट’ जुगार अड्ड्यावर मोठा छापा
२२ मे रोजी हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुणाल राठोड यांच्या शेतातील आखाड्यावर सुरू असलेल्या ‘तिरंट’ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. येथे तब्बल आठ जणांना ताब्यात घेत जुगार साहित्य, नगदी आणि दोन स्कुटीसह १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिमायतनगर परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या कारवाईमुळे जुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व कारवायांमध्ये मटका-जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि वाहनांसह एकूण १,३०,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
“मटका-जुगारवाल्यांवर पोलिसांचा करडा हात; ऑपरेशन क्रॅकडाऊनने अवैध धंदेवाल्यांची झोप उडाली!” अशी चर्चा आता जिल्हाभर रंगू लागली आहे. पोलीस प्रशासनाने यापुढेही अशीच धडक मोहीम सुरू ठेवण्याचे संकेत दिल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
